गुवाहाटी : आसाममधील जोरहाट येथील 'रौरिया एअरफोर्स स्टेशन'वर झालेल्या भारतीय वायू दलाच्या 'AN-32' मालवाहू विमान अपघातात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी माहिती समोर आली आहे. शनिवार (१३ जून) रोजी झालेल्या या भीषण दुर्घटनेत वायू दलाचे पायलटसह ५ जवान शहीद झाले आहेत. तर विमानाचे को-पायलट गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. अरुणाचल प्रदेशातील आपली मोहीम फत्ते करून हे विमान नियमित उड्डाणाअंतर्गत जोरहाट एअरबेसवर परतत होते, मात्र लँडिंगच्या वेळीच काळाने घाला घातला.
लँडिंगच्या वेळी दुर्घटना; एअरबेसच्या आत लागली आग!
भारतीय हवाई दलाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान जोरहाट रनवेवर उतरत असतानाच हा भीषण अपघात झाला. हे विमान मुख्य लँडिंग स्ट्रिपवर (धावपट्टी) उतरू शकले नाही, तर एअरबेसच्याच एका गवताळ भागात त्याची क्रॅश लँडिंग झाली. विमान वेगाने आदळल्यामुळे त्याचा मोठा स्फोट झाला. अपघात इतका भयानक होता की, एअरबेसच्या आवारातच विमानाने पेट घेतला आणि विमानाचे तुकडे झाले. आग लागल्याचे समजताच एअरबेसवरील आपत्कालीन पथक आणि फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने वायू दलाच्या ५ जवानांना वाचवण्यात अपयश आले आणि ते शहीद झाले. या भीषण आगीतून को-पायलटला अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले असून, सध्या त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात शर्थीचे उपचार सुरू आहेत.
हवाई दलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
हा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की हवामानातील बदलामुळे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय हवाई दलाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, अपघाताच्या सखोल तपासासाठी 'कोर्ट ऑफ इंकॉयरी'चे म्हणजेच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.